नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ खडसे यांच्यापेक्षा भाजपमध्ये मी सिनियर होतो, कुणाला लवकर तिकिट मिळाले म्हणून सिनीअर म्हणून मिरवता येत नाही अशा शब्दांमध्ये माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज खडसेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यात रंगलेला सामना हा काही बंद होणार नसल्याचे दिसून येत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले करत असतांना खडसे यांनी दाऊदच्या कथित हस्तकासोबत गिरीश महाजन यांनी घेतलेल्या भोजनाचा उल्लेख नुकताच केला होता. यावर भाजपच्या नाशिक प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर येथे पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजनांनी त्यांच्यावर पलटवार केला.
याप्रसंगी आमदार गिरीश महाजन म्हणाले, की एकनाथराव खडसे यांची मानसिकता बिघडली आहे. खडसे माझ्यापेक्षा सिनिअर नाही. त्यांच्या आधी मी भाजपमध्ये आहे. उमेदवारी लवकर मिळाली, म्हणून त्यांना सिनिअर म्हणता येणार नाही. सर्वांनाच ते माझ्यामुळे मोठे झाल्याचे सांगत फिरत असतात. आपण पैसे घेतले असा पुरावा असेल तर तो त्यांनी द्यावा असे आव्हान देखील महाजन यांनी दिले.
आमदार महाजन पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देत आहे, हे दुर्दैवी आहे. सध्या राज्यपाल हटाव मोहीम सुरु आहे. परंतू राज्यपालांची नेमणूक शिवसेना, राष्ट्रवादीच्या हातात नाही. मनासारखे करा अन्यथा हटवा अशी महाविकास आघाडीची भुमिका असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
याप्रसंगी आमदार महाजन यांनी फोन टॅपींग प्रकरणावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या बोलण्याला किंमत नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून ते बोलत असून, तेव्हापासून त्यांना लोक ओळखतात. भाजप-सेना युती तोडण्यामागे संजय राऊत यांचा पुढाकार आहे. फोन टॅपिंगचे पुरावे असल्यास सादर करावे, असे आवाहन करताना राऊत यांच्या जिभेला हाड नसल्याची टिकाही त्यांनी केली.