चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी पुरते हवालदिल झाले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव कृती समिती व मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव म. तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

२६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग यांसारख्या प्रमुख पिकांच्या पूर्णपणे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे दु:ख वाढले आहे. पिके गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात बुडून कुजत चालली आहेत. फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की शासनाच्या निकषानुसार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतकरी बचाव कृती समितीचे भिमराव जाधव यांनी सांगितले की, “ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास व्याकूळ शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येईल. अशा शोकांतिका घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील.” निवेदनात नमूद केले आहे की, आधीच मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात होते, परंतु तरीही त्यांनी पुन्हा पिके घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आता अतिवृष्टीने त्यांचा सर्व आधारच ढासळला आहे.
नुकसानीचे गांभीर्य अधोरेखित करत समितीने शासनासमोर तीन मुख्य मागण्या ठेवल्या आहेत—तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत देणे, सर्वसाधारण पिक कर्ज माफी करणे आणि पिक विम्यांतर्गत तातडीने अग्रिम रक्कम वितरीत करणे. अन्यथा शेतकरी आक्रमक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान लक्षात घेता ओला दुष्काळ घोषित करून तातडीने मदत देणे हीच वेळेची गरज आहे. अन्यथा या विदारक परिस्थितीत शेतकरी टोकाची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही.



