चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव न्यायालयाच्या आवारात एकाने वकिलास जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चाळीसगाव न्यायालयात वकील संघाच्या दालनासमोरील व्हरांड्यात मंगळवारी सकाळी एका व्यक्तीने वकिलास जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत ऍड. सुभाष तोताराम खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१० ते २०१३ दरम्यान करजगाव येथील किसन सांगळे यांनी त्यांच्या शेतजमिनीच्या दिवाणी वादाबाबत, चाळीसगाव न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्या वतीने ऍड. खैरनार यांनी खटला चालवला होता. तसेच त्यांच्या बाजूने मनाईहुकूम पारित करून दिला होता. त्यानंतर सांगळे यांच्या दुसर्या जमिनीबाबत असलेल्या दिवाणी दाव्यात, ऍड.खैरनार यांनी त्यांना दुसरा वकील नेमावा असे सांगितले होते. दोन्ही दाव्यांचा निकाल सांगळे यांच्या बाजूने लागला होता.
त्यानंतर जमिनीबाबतच्या जळगाव दिवाणी न्यायालयातील दाव्याचा निकाल सांगळे यांच्या विरोधात लागला. हे दावे ऍड. खैरनार यांनी लढवले नसताना सांगळे यांनी ऍड. खैरनार व इतर तीन वकिलांविरोधात बार असोसिएशनकडे तक्रार केली होती. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, ऍड. एस.टी. खैरनार हे मंगळवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात उभे असतांना किसन सांगळे याने पिशवीतून पेट्रोलची बाटली काढत ऍड. सतीश खैरनार यांच्या अंगावर पेट्रोल ओतून आगपेटी काढून काडी पेटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही क्षणात एकच खळबळ उडाली. या ठिकाणी उभ्या असलेल्यांनी तात्काळ धाव घेतली. यात ऍड. रणजित पाटील, ऍड. धीरज पवार, ऍड. राहुल पाटील, ऍड. भागवत पाटील यांनी सांगळे याला पकडून पोलिसांच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी ऍड. सुभाष खैरनार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून किसन मोतीराम सांगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास एपीआय सागर ढिकले करत आहेत. ऍड. एस. टी. खैरनार यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याचा शहरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.