अत्तरदेंच्या दांगडोनंतरही सीइओ शांतच ; चूक कुणाची? चर्चेला उधाण !

b29aad35 c23f 4115 b8ac 1eb5a518659a

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हापरिषदमध्ये शनिवारी दुपारी धरणगाव तालुक्यातील साळवा-बांभोरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती तथा भुसावळचे स्वीकृत नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी दांगडो घालत त्यांनी चक्क सीईओ यांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. परंतू एवढा मोठा विषय झाल्यानंतरही सीइओ डॉ.बी.एन.पाटील शांत असल्यामुळे या प्रकरणात नेमकी चूक कुणाची? यावर जिल्हा परिषदेच्या आवारात उलटसुलट चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे हे आपली पत्नी जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासोबत कामानिमित्त शनिवार दुपारी १:३० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या दालनात आले होते. यावेळी सीईओ श्री.पाटील आणि चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात एका विषयावरून जोरदार शाब्दीक वाद झाला. त्यानंतर सीईओ यांनी सदस्या पती चंद्रशेखर अत्तरदे यांना ‘हू आर यू’ म्हटले, याचाच राग चंद्रशेखर अत्तरदे यांना आला. त्यामुळे त्यांनी जि.प.भवनात आरडाओरड करत सीईओ यांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संबंधित व्यक्तीच्या बदली संदर्भात विषय असल्यामुळे डॉ.बी.एन.पाटील हे अप्रत्यक्षरित्या राजकीय दबावात आले असल्याची चर्चा आहे. कारण याविषयावर सीईओ श्री.पाटील यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

 

वास्तविक बघता एवढा मोठा गोंधळ,शिवीगाळ तसेच इतर गंभीर आरोप झाल्यामुळे सीईओ श्री.पाटील यांच्याकडून खुलासा अपेक्षित होता. परंतू त्यांनी कोणताही खुलासा न दिल्यामुळे नगरसेवक श्री.अत्तरदे यांचे आरोप खरे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे अत्तरदे यांनी २०१७ मध्ये बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तत्कालीन सीइओ दिवेगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यास तत्काळ पोलिसात तक्रार देण्यास सांगितले होते. परंतू यावेळी सगळे शांत आहेत. दरम्यान, या संदर्भात सीईओ श्री.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

 

२०१७ मध्ये कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन ; २०१९ मध्ये सामसूम !

 

जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी विविध कामे रखडून पडली असल्याच्या आरोपावरून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कापडणीस व कर्मचारी चंद्रभान पाटील यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या टेबल वर ठेवलेल्या सरकारी फायली ओढून जमिनीवर फेकल्या होत्या. यासोबतच चंद्रशेखर अत्तरदे यांनी मोबाईल क्रमांक ९५१८७०६३४६ वरून बांधकाम विभागाचे कर्मचारी चंद्रभान शालिग्राम पाटील यांच्या मोबाइलवर आणि ८८०५५११०७७ वर फोन करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून चंद्रभान शालिग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरून चंद्रशेखर अत्तरदे (रा. गणेश कॉलनी) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. एवढेचे नव्हे तर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या प्रांगणात कामबंद आंदोलन देखील केले होते.

Protected Content