भारतीयांचे स्वप्न घेवून ‘चांद्रयान-२’ अखेर रवाना

22 07 2019 chandrayaan 2 launch from s 19421451 144636983

श्रीहरिकोटा, वृत्तसंस्था | जगभरातील सर्वच भारतियांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ आज अखेर अंतराळात झेपावले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण करण्यात आले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला.

 

अशी असेल ‘चांद्रयान-२’ मोहीम :- या मोहिमेसाठी चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चंद्रापासून ३० किलो मीटरवर गेल्यानंतर ‘चांद्रयान-२’ची गती कमी करण्यात येईल. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे, संपूर्ण मोहिमेत हीच शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. भारत या मोहिमेत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर एवढे आहे. ‘चांद्रयान-२’ द्वारे ‘लँडर विक्रम’ आणि ‘रोव्हर प्रज्ञान’ चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर ‘विक्रम’ उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे, त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हरला बाहेर येण्यासाठी सुमारे चार तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. त्यानंतर पुढील १५ मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.

Protected Content