सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीने हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार आहे. सोयाबीन 90 दिवसांसाठी 4892 हमीभावाने खरेदी केले जाणार आहे.

सोयाबीन व उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती. तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांसह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सध्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4200 ते 4500 रुपये प्रतिक्विटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी वाढ दिसत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोयाबीनला 4600 रुपयांपर्यंत दर मिळाले होते. त्यानंतर एक महिना किंमत वाढत 5300 रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर दरात सातत्याने घसरण दिसत आहे. महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीचे सरासरी क्षेत्र 41.50 लाख हेक्टर आहे. यावर्षी खरीप हंगामात 51.17 लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे.

Protected Content