मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आयात शुल्क न लावता आपल्या देशात मका आयात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने वाणिज्य मंत्रालयाकडे केले असून मोदी सरकारने मका आयात करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयात शुल्क न लावता मका आयात करण्याची मागणी चुकीची असून येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मका बाजारात येणार आहे. यामुळं हा निर्णय झाला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडणार आहे. त्यामुळं सदरचा निर्णय घेण्यात येवू नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल व कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचेकडे पत्राद्वारे केली. केंद्र सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अनेक महत्त्वपूर्ण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.देशांतर्गत, मका आधीच अत्यंत कमी किमतीत विकला जातेय. उत्पादन खर्च वाढल्यानं किमान आधारभूत किंमत वाढवण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत. आयात शुल्काशिवाय मक्याच्या आयातीला परवानगी दिल्यानं देशांतर्गत मक्याच्या किमती आणखी घसरतील. ज्यामुळं आमच्या मका उत्पादकांचा नाश होईल.
मका हे एक महत्त्वाचे पीक आहे, विशेषतः निकृष्ट दर्जाची जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ प्रदेशात पीक घेतले जाते. कारण बहुतेकदा ते त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव विश्वसनीय स्त्रोत आहे. यावर्षीचा मान्सून चांगला असल्याने शेतकऱ्यांना मक्याचे अधिक उत्पादन मिळेल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मका आयात करण्याची गरज नाही. देशातील पोल्ट्री उत्पादक लॉबीच्या दबावामुळं हा निर्णय घेण्यात आला असावा अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. आपण पोल्ट्री उद्योगाच्या गरजा समजून घेत असताना, आपल्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या विरुद्ध असा निर्णय न घेता समतोल राखणे आवश्यक आहे असे निवेदनात म्हटले आहे. अल्पभुधारक असलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी मक्याच्या किंमतीत वाढ करण्यात यावी, देशांतर्गत किंमतीत आणखी घसरण रोखण्यासाठी परदेशातून मक्याची आयात तात्काळ थांबवण्यात यावी. मकेच्या पिकातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची अपेक्षा असल्याने केंद्र सरकारने परदेशातून मका आयात करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवू नये असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना ऑनलाईन केलेल्या निवेदनात म्हटले आहे.