कोंबडा कापून नव्हे तर कोंबड्याचा वाढदिवस करून थर्टी फर्स्ट साजरा…!

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली दारू, मटन पार्टीमध्ये दरवर्षी लाखो कोंबड्यांची कत्तल केली जात असते. एकीकडे असे चित्र असताना,जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागातील कापडणे परिवाराने मात्र, आपल्या कोंबड्याचा पाचवा वाढदिवस साजरा करून सगळ्याचे लक्ष वेधले आहे. जळगाव शहरातील विक्रम कापडणे हे अनेक वर्षापासून कोंबडींचे पालन करीत आहेत. पाच वर्षापूर्वी त्यांच्या कोंबडीने काही पिल्ले जन्माला घातली होती. मात्र, त्यात एकच पिल्लू जिवंत राहिले होते. अशातच कोंबडी ही मांजराने पळवून नेल्याने, एकट्या पिलाचा सांभाळ कापडणे परिवार गेल्या पाच वर्षांपासून करत आहे.

लहानपासून या कोंबड्याला घरातल्या लहान बाळा प्रमाणे सांभाळ केला असल्याने, या कोंबड्याला आणि कापडणे परिवाराला एकमेकांविषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे. घरातील सदस्या प्रमाणे पाच वर्ष या कोंबड्याला कापडणे परिवार सांभाळत आहेत. ३१ डिसेंबर रोजी येणारा वाढदिवसही ते गेल्या पाच वर्षापासून
आवर्जून साजरा करत आहेत. कोंबड्यांचा वाढदिवस साजरा करताना त्याला हार घालून, औक्षण करून आणि केक भरवत वाढदिवस साजरा करतात. विशेष म्हणजे कापडणे परिवाराने आपल्या कोंबड्याचे जन्मापासून तर आतापर्यंतचे सगळे फोटो देखील सांभाळून ठेवले आहेत. लहान असताना हे कोंबडीचे पिलू चिमणी सारखे दिसत असल्याने त्याचे नाव चिमण्या ठेवण्यात आले असून,परिसरात चिमण्या नावाचा कोंबडा आणि त्यांचा सांभाळ करणारे, कापडणे परिवार चर्चेचा विषय बनले आहे.

Protected Content