अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर पोलीस ठाण्याने चार पोलीस चौक्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या हस्ते सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाप्रंसगी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, सुनिल हटकर, निंबा शिंदे आदी उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव आणि पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या कार्यकौशल्याने शहरातील बंद पडलेल्या आणि दुरावस्था झालेल्या गांधलीपुरा, पैलाड, बसस्थानक, या पोलीस चौक्यांना सुसज्ज केले आहे. गांधलीपुरा, पैलाड, बसस्थानक, झामी चौक पोलीस चौकी ,धुळे रोड याठिकाणाच्या पोलीस चौक्या अद्ययावत सुंदर करून डिजिटल यंत्रणेशी जोडल्यामुळे शहर व तालुक्यातील नागरिक बऱ्याच प्रमाणात सुरक्षित झाले आहेत.
प्रवेशद्वाराजवळही लावणार सीसीटीव्ही कॅमेरे
अमळनेर धुळे राज्य मार्ग १५ वर प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी शहराच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वाराजवळ पोलीस चौकी उभारली आहे. या ठिकाणी चौकी उभारल्यामुळे शहराबाहेर पळून जाणारे चोर, तसेच अवैध धंदे करणारे किंवा संशयित वाहने, व्यक्ती यांना प्रवेशद्वाराजवळ हटकण्यासाठी पोलिस निरीक्षक हिरे पोलिसांची गस्त ठेवणार आहेत. त्यामुळे शहराच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. याच प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांचे नंबर कॅमेऱ्यात टिपले जातील. परिणामी अपघातातील वाहने आणि आरोपी सापडण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच वेगावर नियंत्रण मिळवून अपघातापासून बचाव केला जाणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षेत भर
डीवायएसपी राकेश जाधव आणि पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लोकांकडे, संस्थांकडे, दानशूर व्यक्तींकडे जाऊन मुख्य रस्ते, चौक, महत्वाचे परिसर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण केले आहे. बंद पडलेल्या आणि दुरवस्थेत गेलेल्या गांधलीपुरा, पैलाड, बसस्थानक या पोलीस चौक्या देखील सुसज्ज करून त्याठिकाणी कॅमेऱ्यांना जोडणारे टीव्ही संच ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे चौफेर पोलिसांच्या डोळ्यांची नजर जनतेवर राहणार आहे. कोणताही अवैध प्रकार घडल्यास त्याचे पुरावे तात्काळ मिळून नागरिकांच्या सुरक्षेत भर पडणार आहे.