नवी दिल्ली- सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले की नाही? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारांना एका प्रकरणाच्या सुनावणी वेळी केली आहे.
पोलिसांचा कारभार पारदर्शक असला पाहिजे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. या दृष्टीने सर्व पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्याकडे देशातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबाची ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्डींगबाबतची माहिती देण्यात मदत मागितली होती. याबाबतची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.