जिल्ह्यात सीसीआय खरेदी केंद्र बंद; शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, यंदाही मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाली असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासकीय हमीभाव मिळणे अपेक्षित असताना, सीसीआय खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ४० ते ४५ टक्के कापूस घरात पडून असून, कवडीमोल भावात व्यापारी कापूस मागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सीसीआय खरेदी केंद्र सुरू असताना ते अचानक बंद का करण्यात आले, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या धुळे आणि बुलढाणा जिल्ह्यांत खरेदी केंद्र सुरू असताना, जळगावातच केंद्र का बंद करण्यात आली, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, त्यांनी काबाडकष्ट करून पीक पिकवले आहे, त्यांना योग्य भाव मिळावा, हीच अपेक्षा आहे. सीसीआय केंद्र त्वरित सुरू करावे, अन्यथा मनसे स्टाईलने कापूस आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश भास्कर पाटील यांनी दिला आहे.

या आंदोलनात प्रदीप पाटील (तालुकाध्यक्ष), संदीप मांडोळे, विलास सोनार (तालुका संघटक), देवेंद्र माळी (तालुका उपाध्यक्ष), हर्षल वाणी (शहर सचिव), मनोज लोहार (तालुका सचिव) आणि अशोक कोळी सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन सीसीआय खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Protected Content