CBSE दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर 


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांनी 2026 च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांचा प्रारंभ 17 फेब्रुवारी 2026 पासून होणार असून, विद्यार्थ्यांना तयारीसाठी तब्बल 110 दिवसांचा म्हणजे चार महिन्यांहून अधिक कालावधी मिळणार आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर cbse.gov.in वर CBSE Datesheet 2026 प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये विषयानुसार परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक दिले असून, विद्यार्थी हे वेळापत्रक ऑनलाईन पाहू आणि डाउनलोड करू शकतात. सीबीएसईच्या नियोजित कार्यक्रमानुसार, दहावीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार आहे.

परीक्षा दररोज सकाळी 10.30 वाजता सुरू होऊन दुपारी 12.30 वा. किंवा 1.30 वा. संपणार आहे. यंदाच्या सत्रात 204 विषयांमध्ये परीक्षा घेतली जाणार असून, भारतासह जगातील 26 देशांतील एकूण सुमारे 45 लाख विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होणार आहेत. लेखी परीक्षेसोबतच प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन आणि निकालाची प्रक्रिया सीबीएसई मंडळाकडून एकाच प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही 2026 च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य मंडळानुसार, बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात येईल. यंदा दोन्ही परीक्षा मागील वर्षांच्या तुलनेत दोन आठवडे लवकर आयोजित करण्यात आल्या असून, शासनाकडून या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अधिक काळ अभ्यासाची संधी मिळावी, तसेच निकालाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरू करता यावे, यासाठी सीबीएसईने वेळापत्रक आधीच जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे.