नाशिकमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; सीजीएसटी अधीक्षक ५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक


नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । शहरात भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. सीबीआयच्या पथकाने अधीक्षक शर्मा यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक आयुक्तालयाबाहेर अटक केली. या प्रकरणामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, शर्मा यांनी एका खाजगी कंपनीच्या आयजीएसटी इनपुट टॅक्स प्रकरणात कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. बराच समजावल्यानंतर त्यांनी ही रक्कम कमी करून २२ लाख रुपये केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी मागितले होते. याच रकमेच्या देवाणघेवाणीवेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून शर्मा यांना पकडले.

अधिकाऱ्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर करण्यात आलेल्या छाप्यादरम्यान १९ लाख रुपये रोख आणि गुन्ह्याशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अटकेनंतर आरोपीला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून वेगाने सुरू आहे.

दरम्यान, सीबीआयने दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत गुवाहाटी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (एनएचआयडीसीएल) चे कार्यकारी संचालक यांनाही १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या अधिकाऱ्यासोबतच एका खाजगी कंपनीतील दोन व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने आरोपी कार्यकारी संचालकाच्या मालमत्तेची तपासणी सुरू केली असून, या कारवाईनंतर सरकारी अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.