नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय प्रवेश-पात्रता परीक्षा (नीट) च्या कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. गेल्या २४ तासांत सरकार नवनवीन निर्णय घेत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंग यांनाही हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे एनटीएचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
यासोबतच आरोग्य मंत्रालयाने स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नीट-पीजी प्रवेश परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. नीट-पीजी परीक्षा आज होणार होती. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे संबंधित मंत्रालयाने म्हटले आहे.
५ मे रोजी झालेल्या नीट-यूजी मध्ये गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आल्यानंतर देशभरात गदारोळ माजला असून, सर्वोच्च न्यायालयात नीट परीक्षा रद्द करण्यात यावी यावर खटला सुरू आहे. दरम्यान, आत केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या हितासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे शिक्षण मंत्रालयाने सांगितले. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून नीट परीक्षेत गैरव्यवाहार केल्याचे उघड झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही शिक्षण मंत्रालयाने म्हटले.