मुंबई-वृत्तसेवा | आपल्याला जर भोजनात जास्त मीठ घेण्याची सवय असेल तर आपल्याला मूत्रपिंडाचा विकार जडण्याची शक्यता असल्याचे ताज्या संशोधनातून दिसून आले आहे.
मीठ हा भोजनातील अविभाज्य घटक आणि प्रकृतीसाठी आवश्यक असले तरी याचा अतिरेक हा आरोग्याला धोकादायक असल्याचे आधीच सिध्द झालेले आहे. यातच, आता ताज्या संशोधातूनही यातील भयावह पैलू समोर आला आहे. अनेक जण जास्त मीठ खातात. तर बर्याच जणांनी भोजनात वरून मीठ घेण्याची सवय असते. यामुळे सीकेडे म्हणजेच क्रॉनिक किडनी डिसीजचा धोका वाढू शकतो असे एका संशोधनातून समोर आले आहे.
संशोधकांनी ४६५,२८८ सहभागींवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की पदार्थांमध्ये मीठ घालण्याची सवय सीकेडी (क्रोनिक किडनी डिसीज) हा विकार होण्यास कारणीभूत ठरू शकते. संशोधकांच्या या चमूला असे आढळून आले की जे लोक त्यांच्या जेवणात मीठ घालत नाहीत त्यांच्यापेक्षा जे लोक त्यांच्या जेवणात मीठ घालत नाहीत त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. उच्च ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट (मूत्रपिंडाच्या चाचण्या) आणि कमी बॉडी मास इंडेक्स असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक असल्याचेही या पथकाला दिसून आले.
आधीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पदार्थांमध्ये जास्त मीठ वापरण्याची सवय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, अकाली मृत्यू आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढवू शकते. याला ताज्या संशोधनाने दुजोरा दिला आहे.