रावेर ( प्रतिनिधी) तालुक्यातील पूरी येथे शेतात बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करून फडशा पडल्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती पुरी शेती-शिवारात पसरताच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत वृत्त असे की, पुरी शिवारात तापी नदीच्या काठी गोविंदा कोळी यांच्या शेतात नेहमी प्रमाणे त्यांची गाय आणली. त्यानंतर तिला चराईसाठी सोडून दिली. सायंकाळी घरी जातांना गोविंदा कोळी हे गाय घरी नेण्यासाठी विसरले. त्यामुळे गाय शेतातच बांधलेली राहिली. त्यानंतर मध्यरात्री बिबट्याने या गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. सकाळी श्री.कोळी शेतात आल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला मिळताच आहेरवाडीचे वनपाल अतुल तायडे, रवी तायडे, गोविंदा कोळे वनमजूर विजू पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला व पगमार्गाचा शोध घेतला असता हा हल्ला बिबट्याने केल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातारवण पसरलेले आहे.