चटई कंपनी मालकाची दोन लाखात फसवणूक ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । चटई बनवण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक दाण्याच्या मटेरियलचा पुरवठा करण्याची बतावणी करत भामट्याने एमआयडीसीतील चटई कंपनीच्या मालकाची २ लाख रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अयोध्या नगरातील रहिवासी संतोष महिपत इंगळे वय ५६ या उद्योजकाची एमआयडीसीत  व्ही हेक्टर येथे शक्ती पॉलीमर्स नावाची चटई कंपनी आहे. नेहमीप्रमाणे कंपनीत असताना जगतपुरा जलपूर येथील श्री श्याम एंटरप्राइजेजचे कुंदनलाल नामक व्यक्तीने संतोष इंगळे यांना संपर्क साधला. चटई बनविण्यासाठी लागणारा प्लास्टिक दाणा रॉ मटेरियलचा पुरवठा करतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्याच्यावर विश्वास ठेवत इंगळे यांनी सहा टन विविध प्लास्टिक दाणा मालाची ऑर्डर दिली. या ऑर्डरनुसार संबंधिताने इंगळे यांच्याकडून  १ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन दोन लाख रुपये स्विकारले. पैसे देऊनही संबंधिताने मालाचा पुरवठा न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उद्योजक संतोष इंगळे यांनी  याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून श्याम इंटरप्रायजेसचे कुंदनलाल नामक व्यक्तीविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत

 

 

Protected Content