मुंबई प्रतिनिधी । कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात करून भाजपला टोला मारला आहे.
एबीपी-माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यात राज्य सरकारचे स्टिअरिंग कुणाच्या हाती, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, माझं बळ हे लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती, पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आमचे सरकार समन्वयाने सुरू आहे. आरोप सगळ्यांवर केले जातात. बोलणारे खूप लोक आहेत. मी कुणाचीही पर्वा करत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आमच्या नात्याची कुणीही चिंता करू नये. बाळासाहेब ठाकरे भाजपला काय म्हणायचे हे सगळ्यांना ठाऊक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, पुढील निवडणुकीत ठाकरे-पवार पॅटर्न राबवणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकांना अजून खूप वेळ आहे आणि सरकार नंतरसुद्धा येणार आहे. किमान समान कार्यक्रमावर सरकार चालले आहे. भिन्न विचारांचे पक्ष आहेत हे आम्हाला तिघांनाही ठाऊक आहे. मुख्यमंत्री फिरत नाही असे आरोप होत असल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता न फिरता काम करणं चांगलं की, न काम करता फिरणं, असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेत्यांच्या टीकेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, असं आहे की इथे एकमेव नेता ते आहेत. ते म्हणजे तेच. एवढा ज्ञानी माणूस आहेत. डब्लूएचओही त्यांना सल्लागार म्हणून बोलावू शकते. भाजपसोबत आमचा घटस्फोट झाला आहे. तेव्हा आमच्या नात्याची चिंता कशाला करता, असा सवाल त्यांनी केला. आम्ही तीस वर्षं होतो पण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. पण ज्यांच्यासोबत ३० वर्षं संघर्ष केला त्यांनी विश्वास दाखवला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. चष्मा घालायला हरकत नाही, पण झापडं लावू नका, असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.