मुक्ताईनगर प्रतिनिधी । ओबीसी वर्गवारीसाठी असणारी क्रिमीलेअरची मर्यादा हटवावी अशी मागणी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत केली आहे.
क्रिमिलेअरमध्ये येणारे मागासवर्गीय, ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, असे लाभार्थी ओबीसी आरक्षणाच्या लाभापासून क्रिमिलेयरच्या मर्यादेमुळे वंचित राहतात. त्यामुळे ओबीसींसाठी क्रिमिलेयरची मर्यादा हटवावी अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेच्या सभागृहात सामाजिक न्याय मंत्र्यांकडे केली.
ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन, सेन्ट्रल रेल्वे भुसावळ व इतर ओबीसी संघटनांतर्फे ओबीसी आरक्षणातील क्रिमिलेयर मर्यादा हटवावी आणि इतर मागण्यांसाठी खासदार खडसे यांच्याकडे निवेदन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी लोकसभेत ही मागणी केली. यासोबत आगामी २०२१ मधील जनगणनेत ओबीसी जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी देखील त्यांनी याप्रसंगी केली. त्यामुळे ओबीसी जनगणनेनुसार आरक्षण वाढेल असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.