Home Cities भुसावळ भुसावळात अंधश्रद्धेविरोधात एल्गार! छुप्या बुवा-बाबांवर कारवाईच्या मागणीसाठी अंनिसचे धरणे आंदोलन

भुसावळात अंधश्रद्धेविरोधात एल्गार! छुप्या बुवा-बाबांवर कारवाईच्या मागणीसाठी अंनिसचे धरणे आंदोलन

0
31

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने कार्यरत असलेल्या तथाकथित बुवा-बाबांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, त्यांच्या कार्यपद्धतीचे पोलिसांमार्फत सर्वेक्षण करून कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) भुसावळ शाखेच्या वतीने रविवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जुन्या प्रांत कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनातून अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

राज्यात विविध ठिकाणी अनेक तथाकथित बुवा-बाबा अंधश्रद्धेचा आधार घेत नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अशा व्यक्तींकडून अंधविश्वास पसरविण्याबरोबरच अनेक प्रकारे सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे सांगण्यात आले. भीती, श्रद्धा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत काहीजण आपले जाळे विस्तारत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी नमूद केले.

अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक नागरिक अशा तथाकथित बुवा-बाबांविरोधात तक्रार करण्यास घाबरतात. त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तींची पोलिसांमार्फत माहिती संकलित करून सर्वेक्षण करण्यात यावे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. धरणे आंदोलनादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रभावी जनजागृती मोहीम राबविणे, नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित करणे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. शासनाने आणि पोलीस प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. एकदिवसीय धरणे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधी घोषणाबाजी करत वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार करण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound