मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या (दी.२४) होणार आहे. यावेळी शिवसेना 13, राष्ट्रवादीचे 13 मंत्री उद्या शपथ घेणार आहेत.
उद्या दुपारनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित झाले आहे. यानुसार उद्या शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसचे नेते आज दिल्लीला गेले आहेत. त्यानुसार महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेसकडून थोरातांसह नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आता दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना वगळून नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या आमदारांची नावं चर्चेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.