जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील युवा चार्टर्ड अकाउंटंट सीए हितेश आगीवाल यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात दुहेरी मानाच्या पदांवर नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे जळगावच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर नवे स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सीए हितेश आगीवाल यांची “प्रख्यात विद्वान (वाणिज्य)” म्हणून वैधानिक नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३४(४)(ई) अंतर्गत अधिकृत अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असणार आहे. या भूमिकेतून ते वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभवाचा समन्वय साधत अभ्यासक्रम रचना, कौशल्य विकास, इंटर्नशिप तसेच उद्योगाभिमुख शिक्षणाच्या विविध उपक्रमांत सक्रिय योगदान देणार आहेत.

यासोबतच, भारतीय सनदी लेखाकार संस्थानच्या पश्चिमी भारत क्षेत्रीय मंडळातर्फे त्यांची धर्मादाय विश्वस्त संस्था, व्यक्ती संघ (AOP) व इतर कृत्रिम व्यक्ती तसेच सहकारी संस्था प्रादेशिक समितीवर २०२६–२७ या वर्षासाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमार्फत ट्रस्ट, सहकारी संस्था आणि विविध संस्थात्मक रचनांशी संबंधित धोरणात्मक व व्यावहारिक विषयांवर काम केले जाते, ज्यामध्ये त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
सीए हितेश आगीवाल हे कर सल्ला, लेखापरीक्षण आणि व्यवसाय सल्लागार क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी यापूर्वीही विविध शासकीय व व्यावसायिक समित्यांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या दुहेरी नियुक्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रात उद्योगाशी सुसंगत शिक्षण प्रणाली विकसित होण्यास चालना मिळेल, तसेच व्यावसायिक क्षेत्रात संस्थात्मक व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना सीए आगीवाल म्हणाले की, “ही केवळ सन्मानाची बाब नसून मोठी जबाबदारी आहे. शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार यांमधील दरी कमी करून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि भविष्याभिमुख बनविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.” त्यांनी संबंधित क्षेत्रातील सूचना, मते किंवा अडचणी hiteshagiwal30@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहनही केले आहे.
सीए हितेश आगीवाल यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या नियुक्तींमुळे जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वातून येणाऱ्या काळात शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



