जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भोईटे नगरात बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे तांब्याचे वायर तसेच ३५ हजार रुपये असलेल्या मुलाची मनी बँक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही चोरी ७ ते ८ डिसेंबरदरम्यान भोईटे नगरात झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील भोईटेनगरमधील रहिवासी केतन भागवत सरोदे (३५) यांचा मोटार दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांच्या घरात एक लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तार होत्या. तसेच घरात मुलाच्या मनी बँकमध्ये जमविलेले ३५ हजार रुपये होते. ७ डिसेंबर रोजी सरोदे हे घर बंद करून बाहेर गेलेले होते. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व वरील मुद्देमाल चोरून नेला. घरी आल्यानंतर ही चोरी लक्षात आली व सरोदे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रवींद्र बागूल करीत आहेत.