जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी आणि मका असून भाव कमी झाल्याने प्रशासनाने या पिकांना हमी दराने खरेदी करावे असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहे.
खरीप आणि रब्बीचा हंगाम आटोपल्यानंतर अनेक शेतकर्यांकडे ज्वारी, बाजरी आणि मक्याचे पीक पडून आहे. यातच जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता, खरीपात ज्वारी : १८७२० हेक्टर; बाजरी : ९४८५ हेक्टर आणि मका : ८५७९० हेक्टर तर रब्बी मध्ये ज्वारी : ४८४०३ हेक्टर; मका : ७२३२७ हेक्टर इतकी लागवड करण्यात आली होती. हे सर्व शेतकरी सध्या कमी भाव असल्याने अडचणीत आले आहेत.
या बाबीची दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी जिल्हा प्रशासनाने ही तिन्ही पिके हमी भावाने खरेदी करावीत असे निर्देश दिले आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.