पाटन, गुजरात (वृत्तसंस्था) पाकिस्तानने हवाई दलाचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सोपवले नसते तर, त्यांच्यासाठी ती ‘कत्ल की रात’ ठरली असती, असा इशारा मी दिला होता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. मोदी यांनी गुजरातमधील पाटन जिल्ह्यात रविवारी झालेल्या सभेत काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. या सभेत त्यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचाही उल्लेख केला.
मोदींनी या सभेत सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. ‘भूमिपूत्राची काळजी घेणे हे माझ्या राज्यातील लोकांचे कर्तव्य आहे. गुजरातमधील सर्व २६ जागा जिंकून द्या. माझे सरकार सत्तेत येईल, पण माझ्या राज्यातील २६ जागांवर विजय मिळाला नाही, तर असे का झाले ? यावर २३ मे रोजी वृत्तवाहिन्यांवर चर्चा होईल,’ असे ते म्हणाले. पंतप्रधानपदावर असो किंवा नसो, पण एक तर मी जिवंत राहील किंवा दहशतवादी जिवंत राहतील, असा निर्धार करत मोदींनी मतदारांना भावनिक आवाहन केले. या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मोदी काय करतील हे मला ठाऊक नाही, असे शरद पवार सांगतात. मी उद्या काय करणार आहे ते पवारांना माहीत नाही, तर इम्रान खानला कसे माहीत होणार ? असा सवालही त्यांनी केला.