बुलढाणा, प्रतिनिधी | टेंभुर्णा फाट्याजवळ झालेल्या अपघातात एसटी बस व ट्रक समोरासमोर धडकून २७ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. बस अपघाताची बुलडाणा जिल्ह्यात मालिका सुरूच आहे.
अकोला-शिंदखेडा बस व ट्रक मध्ये अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर टेंभुर्णा फाट्याजवळ जय भवानी पेट्रोल पंपासमोर सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी २२ सामान्य रुग्णालयात तर पाच शासकीय सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत आहे. अकोला येथून खामगावकडे अकोला शिंदखेडा ही बस येत होती दरम्यान, जय भवानी पेट्रोल पंपाजवळ एक कार ओव्हरटेक करत होती त्यामुळे ट्रकची धडक बसला लागल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी प्रवाशांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी धावपळ केली. दरम्यान, बस मध्ये जवळपास ५५ ते ६० प्रवासी असल्याचे बोलले जात आहे.