जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करावे व सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी मराठा समाजाचे गेल्या ११ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता बकाले यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समस्त मराठा समाज व महिलांचा अपमान केला. या संदर्भात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने बकाले यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन दीड महिना झाला परंतु अद्यापपर्यंत किरणकुमार बकाले याला अटक करण्यात आलेले नाही. किरणकुमार बकाले याला अटक करावी, सेवेतून बडतर्फ करावे तसेच त्याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ११ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आज साखळी उपोषणाच्या अकराव्या दिवशी मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किरण कुमार बकाले यांच्या प्रतीकात्मक पुतळा उलटा करून दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच दिवाळी सणानिमित्त साखळी उपोषण तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती मराठा समाजाचे पदाधिकारी यांनी माध्यमांशी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.