दीपनगर कर्मचारी वसाहतीत ‘इतक्या’ घरात घरफोडी

दीपनगर ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील कर्मचारी वसाहतीमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 26 फेब्रुवारी 2025 च्या रात्री, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दक्षिण भागातील कर्मचारी वसाहतीत चोरट्यांनी चार बंद घरे फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरी गेलेल्या ऐवजाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

विशेष म्हणजे, ही कर्मचारी वसाहत भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात येते. अशा ठिकाणी घरफोड्यांचे प्रकार घडत असल्याने केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या घटनेत औष्णिक विद्युत केंद्रातील चार कर्मचाऱ्यांच्या घरांची तोडफोड झाल्याचे आढळून आले आहे. संबंधित कुटुंबे बाहेरगावी गेली असल्याने चोरीला गेलेल्या वस्तू आणि रकमेचा अचूक तपशील मिळू शकलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा अधिकारी आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घरफोड्यांमुळे कर्मचारी वसाहतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांकडून वसाहतीतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः, रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणेकडून गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमध्ये होत आहे.

तसेच, वसाहतीत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह सुरक्षेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. प्रशासनाने इतर अनावश्यक खर्च न करता प्राथमिक गरजा लक्षात घेत सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Protected Content