Home क्राईम चोरट्यांचा धुमाकूळ; सत्या नगरात घरफोडीचा प्रयत्न !

चोरट्यांचा धुमाकूळ; सत्या नगरात घरफोडीचा प्रयत्न !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या कानळदा रोडवरील भाग्यश्री पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या सत्या नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. घरात कोणतेही मौल्यवान दागिने किंवा रोकड नसल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले असले तरी, त्यांनी सामानाचे मोठे नुकसान केले आहे.

काय घडले नेमके?

शाहू नगर येथील रहिवासी तुषार प्रकाश पिसाळ यांचे सत्या नगरात नवीन घर आहे. दिवाळीनिमित्त त्यांची पत्नी माहेरी गेल्यामुळे तुषार पिसाळ हे आपल्या मूळ घरी शाहू नगरात राहत होते. यामुळे सत्या नगरातील घर बंद होते. बंद घर हेरून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. मात्र, घरात मौल्यवान दागिने किंवा रोख रक्कम नसल्याने चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

पाणी टाकण्यासाठी आले अन् चोरी उघडकीस:

तुषार पिसाळ हे आज, शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आपल्या नवीन घराच्या झाडांना पाणी टाकण्यासाठी सत्या नगरातील घरी आले. घरात प्रवेश करताच दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आणि आतील सामानाची नासधूस झालेली पाहून त्यांना चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर तुषार पिसाळ यांचे भाऊ मयूर पिसाळ यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound