बांभोरीच्या दोन वाळू व गौण खनिज तस्करांच्या मालमत्तेवर लावला बोजा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बांभोरी जवळील गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळू आणि गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदार यांनी दोन जणांच्या त्यांच्या मालमत्तेवर बोजा बसवण्यात आला आहे. त्यानुसार त्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया २३ जानेवारी रोजी दुपारी होणार आहे.

या संदर्भात अधिक अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळील गिरणा नदी पात्रातून बेसुमार अवैधरित्या वाळूची आणि गौण खनिजाची वाहतूक करण्यात आली होती. ही वाहतूक बांभोरी गावातील पवन खंडू नन्नवरे आणि ज्ञानेश्वर राजू सपकाळे या दोघांनी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. यात पवन ननवरे याला २ लाख ४१ हजार आणि ज्ञानेश्वर सपकाळे याला २ लाख ६२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता.

दरम्यान दोघांनी दंडाची रक्कम अद्याप भरलेली नव्हती, त्यामुळे तहसीलदार यांनी त्यांच्या मालमत्तेवर बोजा बसविलेला आहे. त्यानुसार आता बोजा बसवलेल्या मालमत्तेचा लिलाव प्रक्रिया २३ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात होणार असून त्यातूनच दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी शुक्रवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकांन्वये कळविले आहे.

Protected Content