बुलेट चोरीतील म्होरक्यास प्रजापत नगरातून अटक

bullet aropi

जळगाव प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसांनी बुलेट व केटीएमसारख्या महागड्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश केला होता. अखेर या प्रकरणातील मुख्य सुत्रधार तुषार जोशी (वय-२३, रा.प्रजापत नगर) याला सुध्दा अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले असून त्याने बुलेट चोरीसह रामानंदनगर हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी शहरासह भुसावळात महागड्या दुचाकी चोरून नेणाऱ्‍या चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. हे चोरटे जळगावातीलच असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात विजय पाटील व मनोज सुरवाडे यांना मिळाली होती़ नंतर त्यांनी तीन जणांना अटक सुध्दा केली़ त्यांच्याकडून सुमारे १ लाखाच्यावर मुद्देमाल चोरीला गेलेल्या बुलेट व केटीएम हस्तगत करण्यात आली होती. दरम्यान, या टोळीचा मुख्यसूत्रधार तुषार जोशी हा शहरातून पसार झाला होता़ पोलीस त्याचा शोध घेत असताना तो राजस्थान येथून नुकताच घरी परतल्याची माहिती विजय पाटील व मनोज सुरवाडे यांना मिळाली़ त्यांनी लागलीच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर यांच्यासह गुरूवारी सकाळीच प्रजापत नगर गाठले व सापळा रचून तुषारला अटक केली.

तुषार याला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यात त्याने सिंधी कॉलनीतून बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर रामानंदनगर परिसरातून देखील एक दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. नंतर शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तुषार याच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Protected Content