खेलो इंडिया स्पर्धेत सायकलिंग ट्रॅक प्रकारात स्नेहल माळीला कांस्यपदक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अमळनेर येथील विद्यार्थिनी स्नेहल माळी हिने खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला असून तिला तीन लाख रुपये बक्षीस व कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धाचे उदघाटन करण्यात आले. सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत अमळनेरची स्नेहल शत्रुघ्न माळी सहभागी झाली होती. तिचा तिसरा क्रमांक आला. स्नेहल रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे.

स्नेहल अमळनेर येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी आहे. आतापर्यंत तिने विविध सायकल स्पर्धेत आठ राष्ट्रीय पदके प्राप्त केली आहेत. खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याने अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, क्रीडा संघटना अध्यक्ष सुनील वाघ, कार्यध्यक्ष संजय पाटील, मुख्याध्यापक के. डी. पाटील, प्रा. तुरणकर यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content