यावल कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ तुटलेला ढापा; अपघाताची शक्यता

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या मार्गावरील रस्त्यावर असलेला ढापा तुटल्यामुळे शेतकरी आणि व्यापार्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी दररोज शेतमाल वाहतूक करणारी वाहने ये-जा करत असून, तुटलेल्या ढाप्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे आणि अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावल तालुक्यातील शेतकरी शेतीमालाचे वजन, मोजमाप आणि विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतात. येथे शेतकरी, व्यापारी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची कायमच वर्दळ असते. बाजार समितीला दोन प्रवेशद्वार असून, दुसऱ्या गेटजवळील रस्त्यावर असलेला ढापा तुटल्यामुळे रस्त्यावर खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे लहान-मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून, एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

या समस्येबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी माहिती देताना सांगितले की, “सदर ढापा यावल नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने आम्ही नगर परिषदेला लवकरात लवकर लिखित पत्राद्वारे याबाबत कळवून तातडीने दुरुस्तीसाठी विनंती करणार आहोत.” स्थानिक शेतकऱ्यांनी आणि बाजार समितीच्या वतीने प्रशासनाकडे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि संभाव्य अपघात टाळले जातील.

Protected Content