ग्रामपंचायतीत लाचखोरी : सरपंचासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात !

0
230

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम कांबळे आणि ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी ९ डिसेंबर रोजी मोठी कारवाई केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे काकोडा गावचे रहिवासी असून, त्यांना त्यांच्या बखळ जागेवर शासनाच्या घरकुल योजनेतून घर बांधायचे होते. यासाठी त्यांना ग्रामसेवकाच्या सहीचा नमुना नंबर ८ चा उतारा आवश्यक होता. तक्रारदार यांनी याबाबत सरपंच तुळशीराम कांबळे यांची भेट घेतली.

यावेळी, सरपंच कांबळे यांनी तक्रारदाराला उतारा काढून दिला, परंतु या कामाच्या मोबदल्यात त्यांनी थेट पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

ACB च्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकार यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष ३,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या लाच मागणीसाठी सरपंच तुळशीराम कांबळे यांनी शिपायाला प्रोत्साहन दिल्याचेही पडताळणीत स्पष्ट झाले. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर ACB च्या पथकाने सरपंच तुळशीराम कांबळे आणि शिपाई आत्माराम मेहनकार या दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.