पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीटभट्टी व्यावसायिकाकडून गौणखनिज वाहतुकीच्या परवान्यासाठी लाचेची मागणी करणार्या तालुक्यातील शिवरे दिगर येथील महिला तलाठ्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील शेवरे दिगर या गावात एका व्यक्तीचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या व्यवसायासाठी मातीच्या परवान्यासाठी शेवरे दिगरच्या तलाठी श्रीमती वर्षा काकुस्ते यांच्याकडे २५ हजार रूपये रॉयल्टी म्हणून जमा केले होते. तथापि, त्यांनी हे पैसे शासन दरबारी जमा न करता स्वत: ठेवून घेतले. यानंतर त्यांनी पुन्हा सदर वीटभट्टी चालकाकडे २५ हजार रूपयांची मागणी केली होती.
या अनुषंगाने, संबंधीत वीटभट्टी चालकाने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विभागाकडे तक्रार केली होती. या संदर्भात केलेल्या चौकशीत वर्षा काकुस्ते यांनी लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचा विरोधी कलमांच्या अंतर्गत पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्यासह प्रशांत बागुल, संतोष पावरा, राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील आणि जगदीश बडगुजर या कर्मचार्यांचा सहभाग असलेल्या पथकाने केली आहे.