मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार तसेच अन्य सहकार्यांसह आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापण्यात आले असून त्यांच्या जागी स्मीता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची कामगिरी चांगली असतांना देखील त्यांचे तिकिट कापल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षातून उन्मेषदादांचा गेम करण्यात आल्याची चर्चा आता होत आहे. खुद्द उन्मेष पाटील यांनी आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी ते उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. स्वत: उन्मेष पाटील अथवा त्यांच्या सौभाग्यवती संपदाताई पाटील यांना शिवसेना-उबाठा पक्षाकडून उमेदवारी मिळेल असे मानले जात आहे.
खासदार उन्मेष पाटील हे आपल्या समर्थकांसह मंगळवारी दुपारी मातोश्रीवर दाखल झाले होते. आपली खासदार संजय राऊत यांच्याशी मैत्री असून यासाठीच आपण मातोश्रीवर आले असल्याची माहिती उन्मेष पाटील यांनी याप्रसंगी दिली. तर, संजय राऊत यांनी उन्मेष पाटील हे नाराज असून त्यांनी आपली मन की बात उध्दव ठाकरे यांना सांगितली असून याबाबत उद्यापर्यंत आपल्याला सर्व काही कळेल असे सांगितले. तर, यानंतर जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी देखील उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच केले. तर सुषमा अंधारे यांनी बुधवारी दुपारी साडे बारा वाजता उन्मेष पाटील यांचा पक्षात प्रवेश होणार असल्याचे सोशल मीडियातून जाहिर केले.
दरम्यान, आज दुपारी उध्दव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. स्वत: उध्दव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार तसेच अन्य सहकार्यांनी देखील शिवसेना-उबाठा मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून जळगाव मतदारसंघात याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर, जळगावातून करण पवार यांना महाविकास आघाडीतर्फे शिवसेना-उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून तिकिट मिळणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.