जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका प्लॉस्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा कामगार तरूण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. घरातील कर्तापुरूष गेल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल दरबार राठोड (वय-२२) रा. शेलगाव ता.बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातीमा नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी रा. बेदावद ता. जामनेर असे जखमी झालेल्या दुसऱ्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, राहूल दरबार राठोड हा तरूण गेल्या २० वर्षांपासून आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमा नगरात वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी कंपनीत काम करत असलेल्या मशिननचा ईलक्ट्रीक शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला जीवन गजानन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणी केली असता मयत घोषीत केले. तर जखमीस खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून मयत राहूल राठोड हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. नंतर आजपासून त्याने प्लास्टीक कंपनीत कामाला सुरूवात केली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याचा दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयताच्या पश्चात आई कौसल, वडील दरबार भिका राठाडे, लहान भाऊ अर्जून आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.