ब्रेकींग न्यूज : रेल्वे बोगद्यातील पाण्याचा अंदाज न असल्याने शेतकऱ्याचा बुडून दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न असल्याने पाण्यात गेलेल्या बैलगाडीला जुंपलेल्या बैलाची सुटका करत असतांना एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ११ जून रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुकलाल लालचंद माळी वय ६३ रा. आसोदा ता. जळगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात सुकलाल लालचंद माळी हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी ११ रोजी मध्यरात्री जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सुकलाल माळी हे सकाळी १० वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान रस्त्यावर रेल्वेचा बोगदा आहे. पावसामुळे या बोगद्यात पाणी साचलेले होते. त्यावेळी याकडून पलीकडे जाण्यासाठी सुकलाल माळी यांनी बैलगाडी बोगद्याखालून जाण्यासाठी टाकली. त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडाले. त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत ताडली. तेव्हढयात भेदलेल्या बैलांनी झटका देवून बाहेर आले. परंतू सुकलाल माळी यांना पोहात येत नसल्याने त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी चमेलीबाई, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे आसोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content