अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जळोद येथे नदीकाठावर पूजा सुरू असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल शामकांत शुक्ल (वय ३८, रा. पाठक गल्ली, अमळनेर) असे मयत पुजाऱ्याचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वर्गीय डॉ. काकासाहेब देशमुख यांच्या ११व्या वर्षश्राध्दाची पूजा अमळनेर तालुक्यातील जळोद येथे नदीकाठावर आयोजित करण्यात आली होती. पूजा शांततेत सुरू असताना पुजारी अमोल शामकांत शुक्ल (वय ३८, रा. पाठक गल्ली, अमळनेर) यांनी होमासाठी अग्नी प्रज्वलित केला. मात्र, त्यातून निर्माण झालेल्या धुरामुळे पुलाखाली असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांपर्यंत धूर पोहोचला, आणि मधमाशा भणकल्या. त्यांनी अचानक हल्ला करत पूजेला बसलेल्या लोकांवर हल्ला केला. येथे उपस्थित असलेल्या काहींनी घटनास्थळाहून पळ काढला. यावेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी “पळू नका, खाली झोपा, मधमाशा चावणार नाहीत,” असा सल्ला दिला. मात्र, स्वतः ते खाली वाकले असताना त्यांच्यावरच मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात अमोल शुक्ल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.