मोठी बातमी : प्रवासी सामान चोरी करणाऱ्या कुख्यात नायडू टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक, मोठा मुद्देमाल जप्त


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने प्रवासी सामान चोरी करणाऱ्या कुख्यात नायडू टोळीला अटक करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी खंडवा रेल्वे स्थानकावर चोरीची घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आपीएफ पथाकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केली.

खंडवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सामान चोरीचा प्रकार घडल्याची माहिती मिळताच जळगाव, भुसावळच्या आरपीएफ आणि खंडवा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलभूषण सिंह चौहान यांनी तपास सुरू केला. या घटनेत एका संघटित टोळीचा हात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. या टोळीतील सदस्य कपडे बदलत वेगवेगळ्या स्थानकांवर जात असल्याचे दिसून आले. तपासादरम्यान, टोळीतील चार जण भुसावळ-उधना मेमो मधून प्रवास करत असल्याची माहिती आरपीएफ पथकाला मिळाली.

त्यानुसार आपीएफचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजीत कुमार यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरक्षक कुलभूषण सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील पो.कॉ. नंदू पाटील आणि अर्जुन सिंह यांच्या तीन सदस्यीय टीमने अमळनेर रेल्वे स्थानकावर सापळा रचला. संशयित आरोपी हे मेमो रेल्वेच्या गाडीच्या ३-४ डब्यांमध्ये असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना तिकीट तपासणीच्या बहाण्याने अडवून ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत अविनाश महारण्णा नायडू (वय २५ वर्षे), अजय महारण्णा नायडू (वय २५ वर्षे), काली कुन्नय्या नायडू (वय २९ वर्षे), तिघे रा. वाकीपाडा, नवापूर जिल्हा नंदूरबार, राजा आरामबम (वय ३३ वर्षे) रा. मध्यप्रदेश यांना अटक केली. या चौघांनी नायडू टोळीचे सदस्य असल्याचे सांगून खंडवा आणि इतर ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून २ धारदार चाकू, २ लॅपटॉप, ७ मोबाईल, ४६ हजार ६०० रूपयांची रोकड असा एकुण २ लाख ८१ हजार २०० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. अटक केलेल्या टोळीला भुसावळ मंडळाच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.