Home क्राईम ब्रेकींग न्यूज : कारचा भीषण अपघात : दोन ठार तर तीन जखमी

ब्रेकींग न्यूज : कारचा भीषण अपघात : दोन ठार तर तीन जखमी


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा-विरवाडे रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी विरवाड्याहून चोपड्याकडे येणाऱ्या चारचाकी गाडीला (क्रमांक एमएच-१९ बीएस-१००८) अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण चोपडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपुर्ण घटनेचा तपशिल :
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अमृत भोई आणि मयुर अरुण राजपूत अशी मृतांची नावे आहेत. हे पाचही तरुण गेल्या आठ दिवसांपासून जैन धर्मीयांच्या एका पारमार्थिक कार्यक्रमात सहभागी होत होते. आज या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता. नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हे तरुण विरवाड्याहून चोपड्याकडे येत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, राहुल आणि मयुर यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींची प्रकृती चिंताजनक :
या अपघातात विजय अमृत भोई (वय ३५), राकू राजपूत (वय ३०) आणि बंटी कोळी (वय ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. विजय भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर राकू राजपूत आणि बंटी कोळी यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चोपडा येथील मोरेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नातेवाईकांचा हृदयद्रावक आक्रोश :
हे पाचही तरुण अत्यंत श्रद्धाळू होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी कडक उपवास धरला होता, त्यांनी घराचे अन्न व पाणी देखील प्राशन केले नव्हते. आज शेवटच्या दिवशी कार्यक्रम आटोपून ते अन्नाचा घास घेणार होते, मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. “इतकी भक्ती करूनही देव आडवा का आला नाही? देवा तू खरंच कुठे आहेस?” असा टाहो फोडत नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. या हृदयद्रावक दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.


Protected Content

Play sound