

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील माणगाव शिवारात केळीच्या बागेत अवैधपणे सुरू असलेली गांजाची लागवड जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संयुक्त कारवाई करून पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
माणगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. माहिती मिळताच, गायकवाड यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास माणगाव शिवारातील एका शेतात धाड टाकली.
यावेळी, केळीच्या झाडांच्या गर्दीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गांजाच्या झाडांची अवैध लागवड केल्याचे पोलिसांना आढळून आले. गांजाची ही झाडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती आणि त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता, लागवड केलेली गांजाची सर्व झाडे पूर्णपणे उध्वस्त केली आणि पुरावा म्हणून काही नमुने जप्त केले.
या कारवाईमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध गांजा लागवडीच्या गोरखधंद्याला मोठा झटका बसला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने अत्यंत गुप्तता पाळून ही यशस्वी कारवाई केली. गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याची कार्यवाही मुक्ताईनगर पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



