ब्रेकींग : गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवत दरोडा; १६ लाख ७६ हजारांचा ऐवज लांबविला !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील दहीवद गावात अज्ञात ७ दरोडेखोरांनी घराच्या मागच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करत गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवत लोखंडी व लाकडी पट्टीने तरूणाला मारहाण करून घरातून सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा एकुण १६ लाख ७६ हजारांचा ऐवज जबरीहिसकावून चोरून नेल्याची धक्कादायक घटना १२ मे रोजी मध्यरात्री अडीच ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सकाळी ११ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील दहीवद गावात घनश्याम धर्मराज पाटील वय २९ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी १२ मे रोजी रात्री झोपलेले असतांना मध्यरात्री २.३० वाजता अज्ञात सात दरोडेखोर हे तोंडाला कापड लावून घराच्या मगच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घनश्याम पाटील या तरूणाला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील १६ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकुण १६ लाख ७६ हजारांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार सकाळी ११ वाजता अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.

Protected Content