जळगाव प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडलेले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांचा राजीनामा अखेर प्र. कुलगुरूंनी मंजूर केला आहे. या माध्यमातून विद्यापीठ कृती समितीच्या आंदोलनाच यश आले आहे.
याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारीराज वादाच्या भोवर्यात सापडले आहे. येथे अनागोंदी कारभार सुरू असल्याने चौफेर टीका होत आहे. यातच एकदा प्रभारी कुलसचिव पदावरून डॉ. एस.आर. भादलीकर यांना काढून त्यांना अनाकलनीय पध्दतीत त्याच पदावर पुन्हा नियुक्ती प्रदान करण्यात आल्याने विद्यापीठ कर्मचारी संतप्त झाले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील कायदा अधिकारी डॉ.एस.आर.भादलीकर यांची नियुक्ती फक्त पाच वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात होती. त्यामुळे सदरचा कालावधी संपून बराचकाळ लोटला असल्यामुळे डॉ.एस.आर.भादलीकर यांची विद्यापीठातील कायदा अधिकारी पदावरील सेवा तातडीने समाप्त करावी अशी मागणी विद्यापीठातील कृतिगटाने मागणी केलेली असतांना, सदर मागणीकडे दुर्लक्ष करुन त्यांची पात्रता नसतांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु यांनी त्यांची प्र.कुलसचिव पदावर पुन्हा नियुक्ती बेकायदेशीर नियुक्ती केल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ म्हणून २७ सप्टेंबर २०२१ पासून विद्यापीठ कृतिगटाने आंदोलन सुरू केले.
याबाबत विद्यापीठात वादग्रस्त ठरलेले व शैक्षणिकदृष्टया अपात्र असलेले डॉ.एस.आर.भादलीकर यांना पुन्हा प्र.कुलसचिव पदावर का नियुक्त केले जात आहे. तर यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यापीठ कृति समितीने त्यांना त्या पदावर दुर केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा विद्यापीठ कृती समितीने घेतला होता. दरम्यान, या आंदोलनामुळे डॉ. भादलीकर यांनी आपला राजीनामा प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्याकडे सुपुर्द केला होता. मात्र अनेक दिवसांपासून हा राजीनामा मंजूर करण्यात न आल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सुध्दा या प्रकरणात लक्ष टाकले होते.
दरम्यान, आज विद्यापीठ कृती गटाचे शिष्टमंडळ आज नाशिक येथे ई. वायूनंदन यांच्या भेटीसाठी गेले होते. याप्रसंगी त्यांनी डॉ. एस. आर. भादलीकर यांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती दिली. दरम्यान, डॉ. एस. आर. भादलीकर यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ कृती समितीच्या लढ्याला यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.