वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वरणगाव परिसरात घडली आहे. ही घटना वरणगाव शहरपासून जवळ असलेल्या आसरा माता मंदिरा जवळील सुसरी वेल्हाळे मार्गादरम्यानच्या वेल्हाळे शिवारातील विटभट्ट्यांवर शनिवारी २२ मार्च रोजी रात्री घडली असून हा प्रकार रविवारी २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला आहे. कौटुंबिक वादातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची आहे अशी फिर्याद महिलेच्या भावाने वरणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. वरणगाव आणि परिसरातील सुसरी वेल्हाळे मार्गाजवळ बीड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील विट व्यावसायिकांनी विटांचे भट्टे सुरू केले आहेत. या भट्ट्यांवर परजिल्ह्यातील मजूर आणले आहेत. त्यातील नियाजोद्दीन मनसूर शेख यांचे कुटुंब या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून मजुरी करत आहे. त्यांची मुलगी सना अजीज शेख आणि जावई अजीज शेखही त्यांच्यासोबत आहेत. मात्र, जावई अजीजला दारूचे व्यसन असून तो नेहमी दारू पिऊन पत्नी सनासोबत भांडण करत होता. शनिवारी २२ मार्च रोजी देखील नेहमीप्रमाणे जावई अजीज शेख हा रात्री दारू पिऊन आला होता. दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर अजीजने पत्नी सना हिचा गळा आवळून हत्या केली, असे मयत सनाचा भाऊ अझर नियाजोद्दीन शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत सना शेखचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. आरोपी अजीज शेख घटनेनंतर फरार झाला असून चौकशील सुरूवात करण्यात आली आहे.