जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील एमआयडीसी परिसरात गुरुवारी रात्री आकाशातून एका अनोख्या आणि १६ किलो वजनाच्या धातूचा तुकडा जमिनीवर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, हा तुकडा नेमका कुठून आला आणि कोणत्या धातूचा आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या रहस्यमय तुकड्याची पाहणी केली आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलिसांनी हा १६ किलो वजनाचा धातूचा तुकडा जप्त केला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेबाबत बोलताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले की, “हा तुकडा नेमका कुठून आला आणि तो कोणत्या धातूचा आहे, याचा तपास केला जाणार आहे. भूवैज्ञानिक किंवा संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने या तुकड्याची तपासणी केली जाईल.”
या रहस्यमय घटनेमुळे जळगावात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा उल्कापिंड आहे की अन्य काही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. काही नागरिक याला खगोलशास्त्रीय घटना मानत आहेत, तर काही जण यामागे दुसरे काही कारण असावे अशी शक्यता वर्तवत आहेत. वैज्ञानिक तपासणीनंतरच या रहस्यमय तुकड्यामागचे सत्य समोर येईल. तोपर्यंत जळगावात या अनोख्या घटनेची उत्सुकता कायम राहणार आहे.