Breaking : लाचखोर नायब तहसीलदार व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतूक करणारे डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यान २५ हजाराची लाच घेणाऱ्या नायब तहसीलदारासह कोतवालाला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट आणि कोतवाल राहूल नवल शिरोडे असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आणि डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट व कोतवाला राहूल नवल शिरोडे यांनी सुरूवातीला तक्रारदाराला ३० हजाराची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २५ हजार रूपये देण्याचे ठरविले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवारी १६ मार्च रोजी दुपारी सापळा रचला. यावेळी नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट व कोतवाल राहूल नवल शिरोडे हे तक्रारदारकडून २५ हजाराची लाच घेतांना पोलीसांनी रंगेहात पकडून अटक केली. एसीबी पथकाने केलेल्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Protected Content