मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून पक्षांतर्गत वाद व धुसफूस सुरू होती. यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. काँग्रेसचे नेते बाळासाहेबत थोरात यांनी आज काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून हा वाद विकोपाला गेल्याचे एकीकडे दिसून येत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झाले, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. यासंदर्भात हायकमांडकडे नाराजी दर्शवणारं एक पत्रही पाठवल्याची माहिती काल थोरात यांनी दिली होती. मंगळवारी रोजी सकाळी अखेर त्यांच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी राजकीय कारकीर्दीतला मोठा निर्णय जाहीर केला आहे.