आंध्र प्रदेश (वृत्तसंस्था ) ‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांना माध्यमांशी बोलण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
वायएसआर काँग्रेस विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचा आरोप तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. त्याविरोधात चंद्राबाबू यांनी ‘चलो आत्मकूर’ आंदोलनाची हाक दिली होती. पलांडू विभागातील गुंटूर येथील पक्ष कार्यालयापासून ते आत्माकूरपर्यंत बुधवारी रॅली काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी चंद्राबाबू नायडूसह त्यांचा मुलगा नारा लोकेश याला ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले आहे. दोघांनाही त्यांच्याच घरात ठेवण्यात आले आहे. सरकारने या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा करणाऱ्या चंद्राबाबूंना सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.