भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील कंडारी गावातील नागसेन कॉलनीचे रहिवासी आणि प्रसिद्ध बॉक्सिंग प्रशिक्षक स्टीफन डेव्ह यांचा नीलगायच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. १७ मे) पहाटे चारच्या सुमारास जामनेर रोडवरील पानाच्या कुऱ्हे गावाच्या पुढे घडली. या अपघातात त्यांचे जावई अहिरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, स्टीफन डेव्ह (वय अंदाजे ५५) आणि त्यांचे जावई अहिरे बुलेट मोटारसायकल (क्रमांक MH-12-SH-1716) वरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान, पानाच्या कुऱ्हे गावाजवळ अचानक नीलगायांचा कळप महामार्गावर आल्याने त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात डेव्ह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र स्टीफन डेव्ह यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जखमी जावयाला अधिक उपचारासाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, डेव्ह यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
स्टीफन डेव्ह हे रेल्वे सेवेत कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक तरुण खेळाडूंना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देत राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी महाराष्ट्राची शान वाढवली आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांचा भुसावळ आणि परिसरात मोठा दरारा होता.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भुसावळमधील क्रीडा वर्तुळात आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक शिष्य, मित्रपरिवार, आणि क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर शोकसंदेश देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
स्टीफन डेव्ह यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या योगदानाचे स्मरण करत अनेकांनी शासनाकडे रस्त्यावरील वन्यजीव धोक्यांविषयी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.